Skip to main content

वाचन प्रेरणा दिन - 15 ऑक्टोंबर 2023


आज वाचन प्रेरणा दिन !

१५ ऑक्टोंबर या दिवशी आपल्या भारताचे मिसाईल मॅन, आदरणीय डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम साहेबांची जयंती भारतभर आदरपूर्वक साजरी केली जाते.

आदरणीय डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम साहेबांना जयंती निमित्ताने विनम्र अभिवादन. आदरणीय कलाम साहेबांचे जीवनचरित्र आम्हा सर्वांना प्रेरणादायी आहे. आदरणीय कलाम साहेब हे भारतीय विज्ञान विश्वाला असे पोरके करुन निघून गेलेत, जणू त्यांच्या अकाली जाण्यामूळे भारताचे अग्नि पंखच विझलेत.

पण या विझलेल्या पंखांनी आपल्या हयातभर, भारताला गरुड झेपेची ताकद दिलीय. प्रेरणा दिली. आणि म्हणूनच त्यांच्या जीवनचरित्रातून नव्या पिढीला प्रेरणा मिळावी म्हणून त्यांची जयंती आपण "वाचन प्रेरणा दिन" म्हणून साजरा करीत आहोत. आपण शैक्षणिक जीवनात सतत पुस्तकांच्या सान्निध्यात राहूनही अंतिमत: अवांतर वाचनामुळेच व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो, असे म्हटले जाते.

वाचनामुळे विचारांची निश्चित अशी बैठक तयार होण्यास मदत होते, वाचनामुळे विचारही बदलतात, असे वाचनाचे अनेक फायदे आपल्याला सांगणारे बरेच जण असतात. मात्र, काय वाचावे आणि काय वाचल्याने आपल्याला फायदा होईल, हे सांगणारे फारच कमी असतात. एखाद्याचे वाचन दांडगे आहे असे आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा त्या व्यक्तीने त्याच्या लहानपणापासून जाड जाड कादंबऱ्यांचा फडशा पाडला असेल, असे गृहीत धरले जाते. मात्र, गोष्टीच्या पुस्तका पासून सुरू झालेली वाचनाची भूक वयाप्रमाणेच वाढत जाते, हेही तितकेच खरे.

'वाचणे' म्हणजे नुसती अक्षर ओळख नव्हेच. वाचन या शब्दाचा आपण सतत अर्थ 'अवांतर वाचन' असाच घेतला पाहिजे. हल्लीची मुले वाचत नाही अशी बहुतेक पालकांची तक्रार असते. वाचन हा खरं तर सतरावा संस्कार आहे. त्यामुळे लहानपणापासूनच तो मुलांवर व्हायला हवा. इतकेच नव्हे तर वयाच्या १२-१५ व्या वर्षापर्यंत त्याचा पाठपुरावा व्हायला हवा, तरच हा आनंदाचा ठेवा आयुष्यभर साथ देतो कारण बालसाहित्याच्या बीजातूनच वाचनसंस्कृतीचा डेरेदार वृक्ष आकारास येतो हे निर्विवाद सत्य आहे.

वाचनाने माणूस ज्ञानी वा प्रगल्भ होतो, समृद्ध होतो, असे बोलले जाते. मात्र, वाचन हे मेंदूसाठी खाद्य आहे. आपल्या क्षणभर ही न थांबता सतत विचार करत राहणाऱ्या मेंदूला वेळोवेळी वाचनाचे खाद्य पुरवायलाच हवे अन्यथा 'रिकामे मन नी सैतानाचे घर' अशी अवस्था मनाची होवून मन हे कदाचित विघातक गोष्टींकडे वळू शकते. वाचन हा केवळ दैनंदिन जीवनातला एक सोपस्कार नाही, अथवा साक्षरतेचे कौशल्य दाखविणारे ते साधनही नाही. वाचन हा संस्कार आहे.

हा संस्कार जितक्या लहान वयापासून केला जाईल तितके आपले व्यक्तिमत्व प्रगल्भ बनत जाते. कारण या वाचनामुळे लहान मुलांमधील आकलन क्षमता वाढते. गोष्टींच्या पुस्तकातील कोणत्याही कथेला सुरवात, मध्य आणि शेवट असतोच. कथेच्या या रचनेमुळे लहान मुलांच्या मेंदूला चालना मिळते. ते विचार करायला सुरवात करतात, कारणांशी संबंध जोडतात, तार्किक विचार करीत मनातल्या मनात कथेचा शेवटही योजून ठेवतात.

एखादी गोष्ट अवगत करणे ही लहान मुलांमधील सर्वांत महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. त्यामुळे त्यांच्या मेंदूची जडणघडण होते. वाचनाने विचार क्षमता वाढीस लागण्याचे हे मूळ कारण आहे. वाचन आपल्या मेंदूसाठी व्यायामाचे काम करते. विद्यार्थ्यांवर शालेय जीवनात 'वाचन संस्कार' व्हावेत, यांच्या ठायी समृद्ध अशी अभिरुची, उच्च दर्जाची रसिकता आणि संवेदनशीलता हे मूल्य रूजविण्याच्या हेतूने या 'वाचन प्रेरणा दिनाचे' महत्व आणखीनच वाढते. म्हणूनच विद्यार्थ्यां मध्ये शालेय जीवनापासूनच वाचनाची गोडी निर्माण करणारे उपक्रम राबवले गेले पाहिजेत.

महत्वाचे म्हणजे वाचनाच्या वेगाची संकल्पना प्रत्येकाला असायली हवी. एका नजरेच्या टप्प्यात पुस्तकाचा जास्तीत जास्त भाग यायला हवा, तसा सरावही हवा. भारतीय लोकांचा सरासरी वाचनाचा वेग हा जपानी लोकांच्या सरासरी वाचनाच्या वेगापेक्षा खूपच कमी आहे हे खेदाने का होईना, आम्ही कबूल करतो. कमी कालावधीत जास्तीत जास्त आकलनासह वाचन हे खरे वाचन कौशल्य.


या वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य लक्षात घेवून आम्हाला आज वाचन या क्रियेसंदर्भात आणखी वेगळे काही सांगावयाचे आहे. 'वाचन' हा शब्द आला की, आपण फक्त 'पुस्तकी वाचन' एवढाच मर्यादित अर्थ घेतो. आमच्या मते वाचनाचा अर्थ इतका सिमित नाही. आपली पंचेद्रिये आणि मन ही खरी वाचनाची माध्यमे आहेत, त्यांचा वापर करता यायला हवा. डोळ्यांना जे जे दिसतं ते ते वाचता यायला हवं. मग वस्तु दिसो वा व्यक्ती किंवा घडणारा प्रसंग असो, डोळ्यांनी वाचायला हवं.

नाकाला जाणवणारा गंध वाचता यायला हवा!
कानांनी आवाज वाचता यावा असा सराव हवा!
त्वचेलाही होणारा प्रत्येक स्पर्श वाचता यायला हवा! 
स्पर्शवाचनातून स्पर्शाचा अर्थ कळायला हवा!
निदान वेळेवर सावध तरी होता येते!
जीभेलाही चव वाचता यायला हवी!
पंचेद्रियांच्या वाचनासाठी मनात संवेदना जागृत व्हायलाच हवी!

आणि सर्वांत महत्वाचे की, आपल्याला आपल्या मनाद्वारे दुसऱ्यांचे (किमान आपल्या घरातल्या व्यक्तींचे अथवा मित्रमैत्रीणींचे तरी) मन वाचता यायला हवे. दुसऱ्यांचे मन वाचता येणे हे उच्च कोटीच्या संवेदन शीलतेचे लक्षण आहे. अशा संवेदनशीलतेनेच मानवता जागृत होते हे ही लक्षात घ्यायलाच हवे. थोडक्यात काय, तर आपल्या सर्वच संवेदनांचे परिपूर्ण वाचन प्रत्येकाला करता येणे आवश्यकच आहे.

आता समारोप चारोळीने करुया !

*वाचाल तरच वाचाल !*

'वाचाल तर वाचाल !' हे ब्रीद मानू या धन,
वाचन संस्कृती वर्धन, हेच पाळावे ते वचन;
वाचाव्यात संवेदनाही, या जागृत पंचेद्रियांनी,
पुस्तकाच्या वाचनासवे, करावे मनाचे वाचन !

डॉ. रवींद्र आढाव सर.
ग्रंथपाल
********************************

Comments

Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती - 14 एप्रिल

आज 14 एप्रिल 2023 डॉ. बाबासाहेब  आंबेडकर यांची जयंती. भारतीय संविधानाचे शिल्पकार, राजनीतिज्ञ, तत्वज्ञ , समाजसुधारक, पत्रकार, वकील भारतीय  बौद्ध धर्माचे पुनरू ज्ज्जीवक महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती. डॉ. आंबेडकर यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजासाठी खर्ची केले. त्यांनी कोट्यवधी दलितांना सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी दिवसरात्र झटले. डॉ. आंबेडकरांची बुध्दीमत्ता अफाट व अचाट होती. त्यांचे वाचन व लेखन फार मोठे होते. त्यांच्याकडे पंचवीस हजारांवर ग्रंथांचा व्यक्तिगत संग्रह होता. त्यांनी ग्रंथलेखन प्रामुख्याने इंग्रजीतूनच केलेले आहे. मराठी वृत्तपत्रांतून त्यांचे लेखन मराठीत दिसते. त्यांच्या सर्व ग्रंथांची मराठी भाषांतर उपलब्ध आहेत. योगदान - भारतरत्न डॉ. आंबेडकर यांनी आपल्या 65 वर्षाच्या आयुष्यात विविध क्षेत्रात सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक, साहित्यिक, घटनात्मक, औंद्योगिक  क्षेत्रात असंख्य कामे करून राष्ट्र उभारणीत महत्वपूर्ण योगदान दिलेले आहे. वाचनवेड , पुस्तक प्रेम -  डॉ. आंबेडकर यांना वाचनाचे प्रचंड वेड ...

क-हेचें पाणी - प्र. के. अत्रे

प्र. के. अत्रे  हे महाराष्ट्रातील एक झंझावाती व्यक्तिमत्व . शिक्षण, नाटक, चित्रपट, राजकारण, पत्रकारिता, उत्कृष्ट वक्ता प्रसिद्ध होते. त्यांचे पूर्ण नाव प्रल्हाद केशव अत्रे. उर्फ केशवकुमार नावाने ते लिहत असत. त्यांचे आत्मचरित्र क-हेचें पाणी. याचे पाच खंडात त्यांनी विस्तृत स्वरूपात जीवन प्रवास वर्णन केला आहे झेंडूची फुले' विडंबन काव्य, 'गुद्दे आणि मुद्दे', मन हेलावून टाकणारे त्यांचे समधीवरील अश्रू आणि मनाला हुंदके घालायला लावणारी ' हुंदके' हे ग्रंथ मनात घर करून जातात. हिम्मत काय असते हे आचार्य अत्रे यांचे क-हेचें  पाणी पाच खंडातील २५०१ पृष्टांचे आत्मचरित्र वाचले म्हणजे समजते. समुद्रात अनेक नावाडी नाव सोडून असावेत आणि एकदम अचानक तुफान यावे, तुफान पाहून सर्वच नावाडी माघारी फिरतात, परंतु या तुफानालाही न घाबरता एका नावड्याने आपली नाव तूफानातून पुढेच घेवून जावी आणि किनाऱ्यावर बसलेल्या लोकांना वाटावे आता या नावेला कधीही जलसमाधी मिळते की काय? दुसऱ्याच क्षणी नावाड्याने नाव व्यवस्थित तूफानातून बाहेर काढावी आणि किनाऱ्यावरील लोकांनी सांगावे बाबा वळव रे आता माघारी नाव...

वाचन प्रेरणा दिन - 15 ऑक्टोबर 2025

  वाचन प्रेरणा दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!  मोहनराव पतंगराव पाटील महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन  संविधान उद्देशिकेचे वाचन करून तसेच पुस्तकांशी मैत्री, ज्ञानाची खात्री   या भित्तीपत्रकाचे मा. कुमारराव निकम यांच्या हस्ते उद्घाटन करून साजरा करण्यात आला. भारताचे महान वैज्ञानिक, मिसाईल Man म्हणून ओळखले जाणारे, भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्म दिवस. त्यांच्या स्मृतीला वंदन म्हणून त्यांनी दिलेला वाचल तर वाचाल या संदेशाला प्रत्यक्षात उतरविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने त्यांचा जन्म दिवस वाचनप्रेरणा दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला. 2015 पासून हा दिवस वाचन प्रेरणा दिन सर्वत्र साजरा केला जात आहे. डॉ. कलाम यांचे जीवन म्हणजे ज्ञानाची अखंड साधना होती. त्यांची गरिबीतून राष्ट्रपती पदापर्यंतची भरारी ही केवळ त्यांच्या बुद्धिमत्तेवर व वाचनावरील निस्सिम प्रेमामुळेच शक्य झाले . पुस्तके त्यांचे मित्र होते. त्यांनी अनेक तरुणांना वाचनातून आत्मशोध व प्रगतीचा मार्ग शोधण्यासाठी प्रेरित केले. आजच्या या प्रेरणादिन कार्यक्रमा...