Skip to main content

श्रावण

सध्या श्रावण मास सुरु आहे. सर्वांचीच मने हर्षोउल्हासित करणारा हा महिना अनेक कवितांमधून, गीतांमधून अनेक कविंनी रंगवलेला आहे  . . .
          ये रे ये रे पावसा तुला देतो पैसा
          पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा
हे गाणं कोणी आणि कधी लिहिलंय कोणास ठाऊक? लहानपणी ज्यानं हे पाऊसगाणं म्हटलं नसेल तो लहानच नसावा कधी. एक `पैसा’ हे नाणं चलनातून कधीच बाद झालंय. पण आजची कॉन्व्हेंटमधली मुलंही हे गाणं म्हणत पहिल्या पावसात भिजतात. गुगलवर सर्च मारला तरी हे गाणं वाचायला मिळतं. गाणं एवढं साधं, सरळ सोपं, की भर्रकन् पाठ व्हावं. एकही जोडशब्द नाही की बोजड शब्द नाही. लहानपणच्या पावसाचं दुसरं एक गाणं…
         नाच रे मोरा,
         आंब्याच्या बनात,
         नाच रे मोरा नाच…
हे तर कविता म्हणून बालभारतीच्या पुस्तकातही होतं. बाहेर पाऊस सुरू झाला की त्याच्या लयीत सगळ्या वर्गानं हे गाणं एका सुरात म्हणायचं. मोराचं पहिलं दर्शन झालं होतं ते बालभारतीच्या पुस्तकातच.
भरपूर पाऊस यावा अन् शाळेला सुट्टी मिळावी. रेडिओ बहुदा बालगोपाळांच्या मनातली ही भावना नेमकी ओळखायचा. अगदी शाळेत जातानाच रेडिओवर....
          सांग सांग भोलानाथ,
          सांग सांग भोलानाथ,
          पाऊस पडेल काय
          शाळेभोवती तळे साचून,
          सुट्टी मिळेल काय ...
          हे गाणं लागायचं.
श्रावणात पडणाऱ्या पावसासाठी मराठी कवितेत `रिमझिम’ हा शब्द वापरला गेलाय. कित्येक मराठी गाण्यांतून ही 'रिमझिम’ झरताना दिसते. श्रावण महिना म्हटलं की यमुना नदीच्या किनाऱ्यावर हिरवळीवर खेळणारा बाळकृष्ण आणि त्याचे सवंगडी आठवतातच. नदीला पूर आल्यानंतर या कान्हाला शोधणारी यशोदा गाण्यातून दिसते.
          रिमझिम पाऊस पडे सारखा,
          यमुनेलाही पूर चढे,
          पाणीच पाणी चहूकडे, ग बाई,
          गेला मोहन कुणीकडे’
पूर्वी रेडिओवर हे गाणं हमखास लागायचं. गीतकार पी. सावळाराम, संगीतकार वसंत प्रभू आणि लता मंगेशकर ही नावं या गाण्याला चिटकूनच यायची.
हिरवा श्रावण आणि रिमझिम बरसणारा पाऊस हा प्रेमीजनांना साद घालतो. अनामिक हुरहूर लावतो.
          झिमझिम झरती श्रावणधारा
          धरतीच्या कलशा
          प्रियाविण उदास वाटे रात
कवी मधुकर जोशींनी `रिमझिम’ या नेहमीच्या शब्दाऐवजी `झिमझिम’ असा शब्द वापरला आहे. तो वेगळाच नाद उत्पन्न करतो.
पाऊस आणि व्याकुळता हा संबंध फार प्राचीन काळापासून आहे. शंभराहून जास्त वर्षांपूर्वी नाट्य़ाचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी संगीत सौभद्र नाटकासाठी लिहिलेलं हे गीत अजूनही लोकप्रिय आहे.
          नभ मेघांनीं आक्रमिलें,
          तारांगण सर्वहि झांकुनि गेले
          कड कड कड कड शब्द करोनी
          लखलखतां सौदामिनी
          जातातचि हे नेत्र दिपोनी
          अति विरही जन ते व्याकुळ झाले’
नवकवितेच्या आधुनिक काळातले कवी ग्रेस म्हणजे ज्याने त्याने ज्याच्या त्याच्या परीने समजून घ्यावेत. बाकी काही असो,
          पाऊस कधीचा पडतो,
          झाडांची हलती पाने
          हलकेच जाग मज आली,
          दुःखाच्या मंद सुराने
          पेटून कशी उजळेना,
          ही शुभ्र फुलांची ज्वाला
          ताऱ्यांच्या प्रहरापाशी,
          पाऊस असा कोसळला‘
                        किंवा
          ती गेली तेव्हा रिमझिम,
          पाऊस निनादत होता
          मेघांत अडकली किरणे
          हा सूर्य सोडवित होता
ही ग्रेसगाणी कोणालाही व्याकूळ करतात.

आषाढ संपून श्रावणमास सुरू होईपर्यंत पावसाचा जोर जरा ओसरू लागलेला असतो. पण त्यानं निसर्गावर हिरवी पोपटी जादू केलेली असते. श्रावण महिना आणि बालकवींची कविता यांचं युगानुयुगांचं नातं जुळलेलं आहे.
          श्रावणमासी हर्ष मानसी
          हिरवळ दाटे चोहिकडे
          क्षणात येते सरसर शिरवे
          क्षणात फिरूनी ऊन पडे…
बालभारतीच्या पुस्तकात हे गाणं चिरंजीव झालं आहे. प्रत्येक पिढीचं हे गाणं तोंडपाठ आहे.
श्रावणाची आठवण निघालीय आणि कविवर्य भा. रा. तांबे आठवत नाहीत, असं होतच नाही. त्यांची
          पिवळे तांबूस ऊन कोवळे पसरे चौफेर
          ओढा नेई सोने वाटे वाहूनिया दूर
          झाडांनी किती मुकुट घातले डोकीस सोनेरी
          कुरणांवर शेतात पसरला गुलाल चौफेरी
          हिरवे हिरवे गार शेत हे सुदंर साळीचे
          झोके घेती कसे चहुकडे हिरवे गालिचे..’
ही कविता ओठ गुणगुणू लागतातच.
आभाळ भरून कोसळू लागलं की ग. दि. माडगूळकरांनी `वरदक्षिणा’ सिनेमासाठी लिहिलेलं गाणं मनात वाजू लागतं. 
          घन घन माला नभी दाटल्या,
          कोसळती धारा
          केकारव करी मोर काननी
          उभवून उंच पिसारा’
मल्हार रागात बांधलेलं हे गाणं ऐकूनच जणू मेघांमधला पाऊस धरतीवर बरसत असावा.यौवनसुलभ भावना व्यक्त करण्यासाठी एखाद्या मुलीनं आधार घ्यावा तोपावसाचाच. 
आशा भोसलेंनी गायलेल्या
          आज कुणीतरी यावे,
          ओळखिचे व्हावे
          जशी अचानक या धरणीवर
          गर्जत आली वळवाची सर,
          तसे तयाने गावे
या गाण्यानं कित्येक नवपरिणीतांना हुरहूर लावली.
रानकवी ना. धों. महानोरांनी लिहिलेली पाऊसगाणी तर अजरामर झालीत.`जैत रे जैत’ सिनेमासाठी त्यांनी लिहिलेलं 
          नभं उतरू आलं,
          चिंब थरथर वलं,
          अंग झिम्माड झालं,
          हिरव्या बहरात’
परदेशस्थ मराठी माणसं हे गाणं आयपॉडवर ऐकत आपलं मराठीपण जागवत असतात. 
पावसाच्या सोबतीनं ताल धरणारी धम्माल कोळीगीतं तर इतर भाषिकांनाही ताल धरायला लावतायत. कवयित्री शांता शेळकेंनी लिहिलेलं 
          वादलवारं सुटलं गो,
          वाऱ्यानं तुफान उठलं गो
          भिरभिर वाऱ्यात,
          पावसाच्या माऱ्यात
          सजनानं होडीला पान्यात लोटलंय
          वादलवारं सुटलं गो…
हे गाणं अजूनही कोणालाही रोमांचीत करतं. शांताबाईंच्या सुंदर गीतांना सुधीर फडकेंनी अप्रतिम चाली लावल्या. त्यांचे सुपुत्र श्रीधर फडके यांनीही नव्याकोऱ्या पध्दतीच्या संगीतरचना करून शांताबाईंची गाणी बसवली. त्यातलं श्रावण महिमा सांगणारं हे गाणं –
          ऋतु हिरवा, ऋतु बरवा,
          पाचूचा वनि रुजवा
          युग विरही हृदयांवर
          सरसरतो मधु शिरवा,
          ऋतु हिरवा’
शांता शेळकेंनी पावसावर प्रेमगीतं लिहिली, कोळीगीतं लिहिली, तशीच बालगीतंही लिहिली. असंच एक गोड गाणं त्या काळातल्या बालगायिका सुषमा श्रेष्ठ हिच्या आवाजात संगीतकार श्रीनिवास खळे यांनी संगीतबध्द केलंय. 
          पाऊस आला, वारा आला,
          पान लागले नाचू
          थेंब टपोरे गोरे गोरे,
          भर भर गारा वेचू’
आपल्या पिढीला मंगेश पाडगांवकरांच्या गीतांनी भुरळ घातली. नुसतीच भुरळ घातली नाही तर जीवनाचा आस्वाद घेण्याची दृष्टीही दिली. त्याचं अरुण दातेंनी गायलेलं ,
          भेट तुझी माझी स्मरते
          अजून त्या दिसाची
          धुंद वादळाची होती
          रात्र पावसाची
हे गाणं पाऊस आला की अजूनही आपोआप ओठांवर येतं.  
मुंबईतल्या गर्दीत अन् लोकलच्या खडखडाटात कसला आलाय श्रावण, असं तुम्ही म्हणाल. पण पाडगावकर तुमची विकेट घेतील.
          श्रावणात घन निळा बरसला
          रिमझिम रेशिमधारा
          उलगडला झाडांतुन
          अवचित हिरवा मोरपिसारा ..
हे अतिव सुंदर गीत त्यांनी याच धावपळीत लोकलमध्ये जाता येता लिहिलंय.
कॉलेजवयात आरती प्रभूंचं आकर्षण वाटू लागलं ते त्यांच्या पाऊसगाण्यांमुळंच.  
          ये रे घना, ये रे घना,
          न्हाऊ घाल माझ्या मना’
पावसाचा अन् मनभावन श्रावणाचा हा गंध मनात असाच दरवळत राहावा. त्याच्या पोपटी कोवळ्या रुपाचा तजेला तनमनाला उल्हसित करीत राहावा. बस्स!
आणखी काय हवं?

(संग्रहातील)

Comments

Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती - 14 एप्रिल

आज 14 एप्रिल 2023 डॉ. बाबासाहेब  आंबेडकर यांची जयंती. भारतीय संविधानाचे शिल्पकार, राजनीतिज्ञ, तत्वज्ञ , समाजसुधारक, पत्रकार, वकील भारतीय  बौद्ध धर्माचे पुनरू ज्ज्जीवक महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती. डॉ. आंबेडकर यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजासाठी खर्ची केले. त्यांनी कोट्यवधी दलितांना सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी दिवसरात्र झटले. डॉ. आंबेडकरांची बुध्दीमत्ता अफाट व अचाट होती. त्यांचे वाचन व लेखन फार मोठे होते. त्यांच्याकडे पंचवीस हजारांवर ग्रंथांचा व्यक्तिगत संग्रह होता. त्यांनी ग्रंथलेखन प्रामुख्याने इंग्रजीतूनच केलेले आहे. मराठी वृत्तपत्रांतून त्यांचे लेखन मराठीत दिसते. त्यांच्या सर्व ग्रंथांची मराठी भाषांतर उपलब्ध आहेत. योगदान - भारतरत्न डॉ. आंबेडकर यांनी आपल्या 65 वर्षाच्या आयुष्यात विविध क्षेत्रात सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक, साहित्यिक, घटनात्मक, औंद्योगिक  क्षेत्रात असंख्य कामे करून राष्ट्र उभारणीत महत्वपूर्ण योगदान दिलेले आहे. वाचनवेड , पुस्तक प्रेम -  डॉ. आंबेडकर यांना वाचनाचे प्रचंड वेड ...

क-हेचें पाणी - प्र. के. अत्रे

प्र. के. अत्रे  हे महाराष्ट्रातील एक झंझावाती व्यक्तिमत्व . शिक्षण, नाटक, चित्रपट, राजकारण, पत्रकारिता, उत्कृष्ट वक्ता प्रसिद्ध होते. त्यांचे पूर्ण नाव प्रल्हाद केशव अत्रे. उर्फ केशवकुमार नावाने ते लिहत असत. त्यांचे आत्मचरित्र क-हेचें पाणी. याचे पाच खंडात त्यांनी विस्तृत स्वरूपात जीवन प्रवास वर्णन केला आहे झेंडूची फुले' विडंबन काव्य, 'गुद्दे आणि मुद्दे', मन हेलावून टाकणारे त्यांचे समधीवरील अश्रू आणि मनाला हुंदके घालायला लावणारी ' हुंदके' हे ग्रंथ मनात घर करून जातात. हिम्मत काय असते हे आचार्य अत्रे यांचे क-हेचें  पाणी पाच खंडातील २५०१ पृष्टांचे आत्मचरित्र वाचले म्हणजे समजते. समुद्रात अनेक नावाडी नाव सोडून असावेत आणि एकदम अचानक तुफान यावे, तुफान पाहून सर्वच नावाडी माघारी फिरतात, परंतु या तुफानालाही न घाबरता एका नावड्याने आपली नाव तूफानातून पुढेच घेवून जावी आणि किनाऱ्यावर बसलेल्या लोकांना वाटावे आता या नावेला कधीही जलसमाधी मिळते की काय? दुसऱ्याच क्षणी नावाड्याने नाव व्यवस्थित तूफानातून बाहेर काढावी आणि किनाऱ्यावरील लोकांनी सांगावे बाबा वळव रे आता माघारी नाव...

वाचन प्रेरणा दिन - 15 ऑक्टोबर 2025

  वाचन प्रेरणा दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!  मोहनराव पतंगराव पाटील महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन  संविधान उद्देशिकेचे वाचन करून तसेच पुस्तकांशी मैत्री, ज्ञानाची खात्री   या भित्तीपत्रकाचे मा. कुमारराव निकम यांच्या हस्ते उद्घाटन करून साजरा करण्यात आला. भारताचे महान वैज्ञानिक, मिसाईल Man म्हणून ओळखले जाणारे, भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्म दिवस. त्यांच्या स्मृतीला वंदन म्हणून त्यांनी दिलेला वाचल तर वाचाल या संदेशाला प्रत्यक्षात उतरविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने त्यांचा जन्म दिवस वाचनप्रेरणा दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला. 2015 पासून हा दिवस वाचन प्रेरणा दिन सर्वत्र साजरा केला जात आहे. डॉ. कलाम यांचे जीवन म्हणजे ज्ञानाची अखंड साधना होती. त्यांची गरिबीतून राष्ट्रपती पदापर्यंतची भरारी ही केवळ त्यांच्या बुद्धिमत्तेवर व वाचनावरील निस्सिम प्रेमामुळेच शक्य झाले . पुस्तके त्यांचे मित्र होते. त्यांनी अनेक तरुणांना वाचनातून आत्मशोध व प्रगतीचा मार्ग शोधण्यासाठी प्रेरित केले. आजच्या या प्रेरणादिन कार्यक्रमा...