राजर्षी शाहू महाराज (१८७४-१९२२) जीवन परिचय : कोल्हापूर संस्थानचे राजे, थोर समाजसुधारक, बहुजन समाजाचे उद्धारक, कुशल राज्यकर्ते, समतेचे पुरस्कर्ते, प्रजाहितदक्ष संस्थानिक अशी अनेक विशेषणे धारण केलेले राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म २६ जून, १८७४ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथे झाला. कागलचे जहागीरदार जयसिंगराव घाटगे व राधाबाई घाटगे त्यांचे आई-वडील होते. जयसिंगराव ऊर्फ आबासाहेब घाटगे हे कागल जहागिरीच्या थोरल्या पातीचे प्रमुख होते.शाहू महाराजांचे मूळ नाव यशवंतराव होते. १८८३ मध्ये कोल्हापूर संस्थानचे राजे चौथे शिवाजी महाराज यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांना औरस पुत्र नव्हता. त्यामुळे चौथे शिवाजी यांच्या विधवा पत्नी आनंदीबाई यांनी १७ मार्च, १८८४ रोजी यशवंतरावांना दत्तक घेतले. त्याच वेळी त्यांचे नाव छत्रपती शाहू महाराज असे ठेवले.राजघराण्याच्या प्रथेनुसार शाहू महाराजांचे प्रारंभिक शिक्षण खाजगी शिक्षकामार्फतच झाले. त्यानंतर १८८५ ते १८८९ अशी चार वर्षे शाहू महाराजांचे शिक्षण राजकोट येथील राजकुमारांसाठी असलेल्या कॉलेजमध्ये झाले. त्यानंतर कोल्हापूरला परतल्यानंतर त्यांच्या शिक्षणाची जबाब...