सध्या श्रावण मास सुरु आहे. सर्वांचीच मने हर्षोउल्हासित करणारा हा महिना अनेक कवितांमधून, गीतांमधून अनेक कविंनी रंगवलेला आहे . . . ये रे ये रे पावसा तुला देतो पैसा पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा हे गाणं कोणी आणि कधी लिहिलंय कोणास ठाऊक? लहानपणी ज्यानं हे पाऊसगाणं म्हटलं नसेल तो लहानच नसावा कधी. एक `पैसा’ हे नाणं चलनातून कधीच बाद झालंय. पण आजची कॉन्व्हेंटमधली मुलंही हे गाणं म्हणत पहिल्या पावसात भिजतात. गुगलवर सर्च मारला तरी हे गाणं वाचायला मिळतं. गाणं एवढं साधं, सरळ सोपं, की भर्रकन् पाठ व्हावं. एकही जोडशब्द नाही की बोजड शब्द नाही. लहानपणच्या पावसाचं दुसरं एक गाणं… नाच रे मोरा, आंब्याच्या बनात, नाच रे मोरा नाच… हे तर कविता म्हणून बालभारतीच्या पुस्तकातही होतं. बाहेर पाऊस सुरू झाला की त्याच्या लयीत सगळ्या वर्गानं हे गाणं एका सुरात म्हणायचं. मोराचं पहिलं दर्शन झालं होतं ते बालभारतीच्या पुस्तकातच. भरपूर पाऊस यावा अन् शाळेल...