डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक चळवळीचे महत्त्व अधोरेखित करणारे दया पवारांचे बलुतं हे पुस्तक मराठी साहित्यात महत्वाचे मानले जाते. दया पवारांना वाटतं त्याप्रमाणे यांचं जगणं म्हणजे एक कोंडवाडा आहे. समाजातील ज्या घटकाला वर्षानुवर्षे गावकुसा बाहेर ढकलले गेले त्या घटकातील माणसांची एका विशिष्ट कालखंडातील जगण्याची धडपड बलुतं या आत्मकथानकातून अतिशय प्रांजळपणे व्यक्त झाली आहे. अत्यंत अन्यायकारक समाज व्यवस्थेमुळे वाट्याला आलेलं दुःखाचं बलुतं कुणाला सांगू नये इतकं दाहक आहे. हे दुःख मानवनिर्मित आहे. सदर आत्मकथेतील कालखंड १९४० च्या सुमाराचा आहे. बाबासाहेबांनी जागृती सुरू केली तो हा काळ. आत्मकथन म्हणजे एकप्रकारचा आरसाच आहे. फार काळापासुन भारतीय समाज हा जात, वर्ग व लिंगभेदाने बरबटलेला असून त्यात भांडवलशाहिने जणू भरच टाकलीय; अशा काळात मुंबईसारख्या शहरांमध्ये राहणं सामान्य माणसासाठी अगदी दुरापास्त होऊन बसले आहे. ह्या सगळ्या खटाटोपींध्ये आपलं अस्तित्त्व टिकविण्यासाठी कोणकोणत्या दिव्यांचा सामना करावा लागतो याचं यथार्थ चित्रण बलुतं मधून बघायला मिळतं. बलुतं हे आत्मचरित्र दया पवार...