कै. मोहनराव पतंगराव पाटील यांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू
निर्भीड व्यक्तीमत्व –
मोहनराव अण्णांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू होते. सामाजिक कार्याची तळमळ, स्वच्छ व पारदर्शी कारभार, निर्भीड स्वभाव , ओजस्वी संभाषण कला ही अण्णांच्या स्वभावाची वैशिष्ट्ये होती. १९६७ मध्ये अण्णा जिल्हा परिषदेवर निवडून आले. राजारामबापूनी त्यांना वाळवा पंचायत समितीचे सभापती केले. ‘तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी सहकारी तत्त्वावर साखर कारखाना उभा केला पाहिजे’ हे बापूंच्या मनातील स्वप्नं आण्णांनी उत्तमपणे पूर्ण केले. बापूंनी आण्णांच्या वर पंचायत समिती सभापती व साखर कारखान्याचे चीफ प्रमोटर अशी टाकलेली दुहेरी जबाबदारी अण्णांनी उत्तमरीत्या पार पाडली.
मोहनराव अण्णांनी राष्ट्रसेवा दलाचे संघटक म्हणून काम केले. बोरगावात राष्ट्रसेवादलाची शाखा काढून त्यामार्फत विधायक कामे केली. ब्रिटीशांची नजर असल्याने काही वेळेस भूमिगत राहून अण्णांनी सेवा दलाचे काम केले. अशावेळी अण्णांचे निर्भीड वृत्तीचे कौतुक करावं तेवढे थोडेचं. अण्णांनी शेवटच्या क्षणापर्यंत कोणाचीही लाचारी व हुजरेगिरी पत्करली नाही. अण्णांना एखादी चुकीची गोष्ट घडत आहे असे वाटल्यास ते निर्भीडपणे सांगत.
2) ग्रंथमित्र –
ग्रंथालय हे गावाचे वैभव असते. दर्जेदार, उत्तम ग्रंथ वाचनाने समाजात प्रतिष्ठा निर्माण करून देणारे ते एक साधन आहे असे अण्णांचे मत होते. अण्णांना वाचनाची आवड होती. त्यांनी पुत्र मानवाचा, मृत्युंजय, आम्ही चिरे पायरीचे, ययाती, व्ही. शांताराम, श्रीमान योगी, महात्मा फुले, लोकमान्य टिळक, विस्टन चर्चिल, सुभाषचंद्र बोस यासारखी महत्वाची पुस्तके वाचली होती. या पुस्तकावरून त्यांना दर्जेदार साहित्य वाचनाची आवड होती हे दिसून येते. अण्णा नेहमी यशवंतराव चव्हाण यांची भाषणे व कृष्णाकाठ या चरित्राचे नेहमी वाचन करीत असत. त्यांचे वाचन फार मोठे होते. विशेषतः देशपातळीवरच्या नेत्यांची चरित्रे, वैचारिक ग्रंथ यांचे वाचन करीत. बोरगाव मधील ग्रंथालयाची व्याख्यानमाला व दिवाळी अंकांची योजना अडचणीत आली त्यावेळी अण्णांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत केली. वाचावयास नेलेल्या ग्रंथांना लहान मुलासारखे जपले. कधीही कोणत्या प्रकारे पेनाने, पेन्सिलीने खुणा केल्या नाहीत, पुस्तकाची पानेही दुमडली नाहीत उलट पुस्तकाचे आयुष्य वाढावे यासाठी स्वतः कव्हर घालून पुस्तक जमा करीत असत.
अण्णांच्या ग्रंथ प्रेमाबद्दल ग्रंथपाल श्री. आनंदराव शिंदे सांगतात की “उतारवयात दृष्टी कमी झाली होती पण ज्ञानाची आसक्ती कमी झाली नव्हती. आपली ग्रंथवाचनाची इच्छा ते आपल्या नातवंडाकडून पूर्ण करून घेत असत. ग्रंथ वाचनाचे वेड त्यांनी एकदिवसही बंद केलेले नव्हते.”
आदर्श सरपंच –
बोरगावात वेगवेगळे राजकीय गट असताना अण्णांनी त्यांना एकत्र सामावून घेवून विकासाची कामे पूर्ण केली. आण्णांचे चातुर्य, काम करण्यातील तडफदारी पाहूनच अण्णांना गावचे सरपंच केले. अण्णा चांगल्या कामाची प्रशंसा करीत होते. त्यांनी ज्या ज्या पदावर काम केले त्या त्या पदाला त्यांनी आपल्या कामाने व वागण्याच्या पद्धतीने दर्जा प्राप्त करून दिला. अण्णांनी सत्तेच्या माध्यमातून सामान्य माणसांचा विकास केला. उपेक्षित माणसाला सामाजिक न्याय व प्रतिष्ठा मिळवून दिली.
गावाच्या विकासासाठी रस्ते, गटारी, दिवाबत्ती यांची सोय केली. उत्तम पशुधन निर्मितीची सोय केली. ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न केले. कुटुंब नियोजन, लेव्ही योजना अशा प्रकारे राबविल्या की त्या योजनांसाठीचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस त्याकाळात गावाला व तालुक्याला मिळाले. आण्णांनी आपल्या कारकिर्दीत शासकीय योजना १००% यशस्वी केल्या.
कर्तबगार नेता/ नेतृत्व –
१९६४ मध्ये सरकार मार्फत गावागावात ज्वारी नियंत्रित दराने खरेदी केली जात होती. एकाच दिवशी सर्व लेव्हीची ज्वारी गोळा करण्याच्या उद्देशाने लेव्ही दिन घेतला जात असे. श्री बी. बी. सावळवाडे यांनी अण्णांशी विचारविनिमय करून लेव्ही राबविण्याचा बेत आखला. लेव्ही दिनाच्या दिवशी गावातील लोकांनी आपआपल्या बैलगाडीत ज्वारीची पोती भरून आपल्या दारासमोर बैलगाडी सज्ज ठेवल्या होत्या. जिल्हाधिकारी व्यासपीठावर आले तेव्हा ज्वारीचे एकही पोते दिसेना. इतक्यात अण्णा स्टेजवर आले आणि गुरवाने शिंग वाजवताच चोहोकडून बैलगाड्या पोतीभरून देवळाजवळ जमा झाल्या.हजारो पोती ज्वारीची थप्पी जमा झाली. अशा आण्णांच्या योजनाबद्ध कार्यपद्धतीने जिल्हाधिकारी भारावून गेले. अण्णांनी बोरगावात एका दिवसात वाळवा तालुक्यात सर्वात जास्त ज्वारी जमा करण्याचा विक्रम करून दाखविला.
अण्णांनी गावगुंडी राजकारणाच्या तावडीतून तलाठी लोकांना कायमचे भयमुक्त केले. लेव्ही दिन प्रमाणेच कुटुंब नियोजनाचे काम मोठ्या प्रमाणात करून वाळवा तालुक्याला प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळवून दिले. शिबीर, मीटिंग, भाषणं या माध्यमातून त्यांनी प्रबोधन केले. हाती घेतलेले कोणतेही काम जिद्दीने व मोठ्या तडफेने करणे, कोणतीही दिरंगाई न करता ते काम पूर्णत्वास नेणे हे अण्णांच्या स्वभावाचे वैशिष्ट्य होते.
प्रगतशील शेतकरी –
अण्णांचे शेतीवर खऱ्या अर्थाने प्रेम होते. त्यांनी व्यक्तिगत शेतीचे काम अतिशय उत्कृष्टपणे केले होते. शेतीचे नवनवीन प्रयोग राबविले. आपल्या प्रमाणेच गावातील इतर शेतकऱ्यांनाही उत्तम शेती करण्यासाठी ते प्रेरणा देत असत. कोरडवाहू शेती पेक्षा बागायती शेती करण्यासंदर्भात गावातील शेतकऱ्यांना पटवून दिले. चाळीस पन्नास शेतकऱ्यांनी मिळून कृष्णा नदीवर इंजिन बसवून बागायती शेतीचा प्रयोग यशस्वी करून दाखविला. इतर शेतकऱ्यांनी प्रेरणा घेवून कृष्णाकाठ हिरवागार केला. आण्णांच्या सानिध्यात येणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला शेतीनिष्ठ राहण्याचा मंत्र देत असत. शेतीला आईसारखे दैवत मानून शेतीवर प्रत्येकाने प्रेम केले पाहिजे असा उत्साह ते शेतकऱ्यांमध्ये निर्माण करीत. बोरगावात पाणीपुरवठा स्कीम तयार करून ऊस उत्पादनास सुरुवात केली. शेतकऱ्याच्या मालाला दराची हमी मिळावी म्हणून साखर कारखान्याची उभारणी केली व शेतकरी बंधूंची विकासाकडे वाटचाल सुरु झाली.
अभ्यासू व्यक्तिमत्व –
मोहनराव अण्णा अतिशय अभ्यासू होते. ज्या ज्या क्षेत्रांशी त्यांचा संबंध आला त्याचा त्यांनी अभ्यास केला. कोणत्याही क्षेत्रात मागे पडता कामा नये यासाठी त्यांनी अफाट वाचन केले. सर्व क्षेत्राविषयी पुस्तके वाचून अण्णांनी माहिती मिळविली. ग्रंथ वाचून स्वतःला ज्ञानसंपन्न बनविले. अभ्यासू वृत्ती आणि कर्तव्य निष्ठेने काम करण्याच्या पद्धतीमुळे अण्णा आपल्या भागातील उमदा व विश्वसनीय कार्यकर्ता म्हणून ओळखले जावू लागले. अण्णांनी बोरगाव सोसायटीच्या व्यवहारात लक्ष घालताना सोसायटीच्या सर्व व्यवहारांची माहिती घेतली तसेच सहकाराचे कायदे नीट अभ्यासून सोसायटीचा कारभार उत्तम प्रकारे चालविला.
नितीमत्त्तेने बहरलेले व्यक्तिमत्व –
शेतकऱ्यांचे आर्थिक प्रश्न सोडविण्यासाठी सहकारी तत्वावर सोसायटी स्थापन करून अडलेल्या नडलेल्या शेतकऱ्याला कर्जे देवून आर्थिक मदत केली. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीत सुधारणा करता आल्या. अण्णा अतिशय धाडशी होते. ते वडीलधाऱ्याना मानाने वागवीत व सुशिक्षित लोकांचा नेहमी आदर करीत असत. आण्णा निर्व्यसनी होते. त्यांच्याकडे स्वार्थीपणाचा लवलेशही नव्हता. आण्णांची काम करण्याची पद्धत, सभाधीटपणा व इतर गुणांमुळे मंत्री बाळासाहेब देसाईंचा त्यांच्यावर फार मोठा विश्वास होता.
खेर मंत्रीमंडळाने खाजगी शिक्षण संस्थांचे अनुदान बंद केल्याने रयत शिक्षण संस्था अडचणीत आली तेव्हा अण्णांनी पुढाकार घेवून गावातून पाचशे पोती धान्य जमा करून कर्मवीर भाऊराव वसतिगृहाला पाठवून दिले होते. भाऊरावांच्या शैक्षणिक कार्याला हातभार लावण्याचे काम अण्णांनी केले. गावचा असो किंवा तालुक्याचा कोणत्याही प्रगतीच्या कामामध्ये अण्णांचा सिंहाचा वाटा उचलला.
उत्कृष्ठ वक्ता –
ऐन तारुण्यावस्था पासूनच अण्णांनी हाती घेतलेले कोणतेही काम जिद्दीने पूर्ण केले. अण्णांच्या वक्तृत्त्वात आत्मविश्वास होता. सार्वजनिक कामात भाग घेतलेले अण्णा सभेत बोलू लागले म्हणजे त्यांच्या बोलण्याची ऐट, भारदस्त भाषाशैली, प्रसंगारूप आवेश, भावनावशता याची प्रचीती येत असे. अण्णांचे भाषण म्हणजे पर्वणी असायची. गावकऱ्यांना अण्णांचे भाषणं ऐकण्यातच समाधान वाटायचे. स्वतः भावनावश होवून श्रोत्यांना मंत्रमुग्ध करण्याचे सामर्थ्य त्यांच्या वाणीत होते. त्यांची एक खास शैली होती ती म्हणजे बोलता बोलता मध्येच योग्य ठिकाणी “बंधुनो” हे संबोधन वापरायचे.
अण्णांचे भाषेवर प्रभुत्व होते. भाषा दमदार व ओघवती असे. वक्तृत्त्व कलेत हुशार असल्याने आपल्या प्रभावीत वाणीने लोकांची मने जिंकत असत. वक्तृत्त्व ही अण्णांना मिळालेली ईश्वरी देणगीच होती. संभाषण चांगले असल्याने लोकांच्यावर त्यांची चांगली छाप पडत असे. एकदा प्रांतिक कॉंग्रेसचे अध्यक्ष तुळशीराम जाधव यांनी त्यांचे भाषण झाल्यावर अण्णांना लगेच भाषण करण्यास सांगून त्यांनी जे सांगितले तेच सांगण्यास सांगितले. वक्तृत्त्व अगदी जसेच्या तसे अस्खलितपणे म्हणून दाखविले. अण्णांची स्मरणशक्ती चांगली होती. त्यांच्या भाषणात उपमा, अलंकार व विविध अलंकारीत शब्दांचा वापर असे. त्यांची भाषणे समाजाची मने काबीज करीत असत.
संघटन कौशल्य –
अण्णांकडे संघटन कौशल्य हा गुण मूलतःच होता, या गुणामुळेच त्यांना अनेक जीवाभावाचे सहकारी लाभले. त्यांच्या भोवती निकोप कार्यकर्ते मोठ्या संख्येने असत. त्याचे कारण म्हणजे अण्णांना कार्यकर्त्यां बद्दल असणारी आस्था! अण्णांचा स्पष्टवक्तेपणा, करडी शिस्त ह्या गुणांमुळे त्यांचा वाचक सहकाऱ्यांवर असायचा. सहकारी दुखावले गेले तरी अण्णांची खासियत म्हणजे अशा माणसांना स्वतः नावाने बोलावून आपल्या कामात त्यांना संधी देत असत. त्यांचा सहकार्याचा हात त्यांनी कधीच झिडकारला नाही. म्हणूनच त्यांच्या विधायक कार्याला कोणी विरोध करण्याचे मनात सुद्धा आणत नसे.
१९४२ च्या लढ्याच्या पूर्वतयारीसाठी अण्णांनी घोड्यावरून बोरगाव सह ५ वाड्या व दोन खेड्यातील लोकांशी संपर्क साधून मोर्चात सहभागी केले. साखराळे येथे यशस्वी झालेला कार्यकर्त्यांचा मेळावा यातूनही त्यांचे संघटन कौशल्य दिसून येते. या मेळाव्यात यशवंतराव चव्हाण, बाबुराव खोत, बाबुराव चौगुले .... यासारख्या मोठ्या कार्यकर्त्यांचा समावेश होता. या मेळाव्याचे नियोजन अत्यंत चोख व उत्तम प्रकारे करून मेळावा यशस्वी केला. साखराळेच्या ओसाड माळावर साखर कारखान्यासाठी जमीन संपादन करताना जमीन मालकांना नोकरीत समाविष्ट करून घेण्याचे दिलेले अभिवचन अण्णांनी पाळले.
अण्णा समाजाच्या विकासासाठी वेगवेगळ्या योजना आखून प्रत्यक्षात अंमलात आणत असत. त्यांच्या काम करण्याच्या तडफेमुळे आणि कार्यकुशलतेमुळे त्यांच्या भोवती कार्यकर्त्यांचे वलय असे. स्वातंत्र्य चळवळीत श्रेष्टींच्या आदेशानुसार निष्ठेने प्रत्येक काम करणे, सेवादलाची स्थापना करून ग्रामसफाई, स्वच्छता, श्रमदान शिबीर घेणे, देशभर सेवाभावी कार्यकर्ते निर्माण व्हावेत यासाठी प्रयत्न केले. यावरून त्यांचे संघटन कौशल्य दिसून येते. १९६७ साली राजाराम बापूंची सभा यलम्मा चौकात होवू देणार नाही, झाल्यास ती उधळून लावू अशी घोषणा विरोधी पक्षाने केली होती. त्यावेळेस आण्णांनी पुढाकार घेवून आपल्या संघटन कौशल्याचा वापर करून सर्व कार्यकर्त्यांना बहुसंख्येने गोळा करून ती सभा यशस्वीपणे पार पाडली .
Comments
Post a Comment